मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यसभेची निवडणूक लवकरच होत असून,ही निवडणूक बिनविरोध होणार नाही,असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तविला आहे.तसेच संभाजीराजे यांनी खासदारकीबाबत सर्वच पक्षांशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिकची मते नसल्यामुळे आम्ही एकच जागा निवडून आणू शकतो, असेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
राज्यसभेसाठी आज शिवसेनेकडून दोन जागांसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.भाजपच्या दोन जागा निवडून येवू शकतात.त्यातच संभाजीराजे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नसल्याने संभाजीराजे उद्या कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचा अंदाज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तविला आहे.आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा अंदाज वर्तविला.संभाजीराजे यांनी खासदारकीबाबत सर्वच पक्षांशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिकची मते नसल्यामुळे आम्ही एकच जागा निवडून आणू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर पडलेल्या ईडीच्या धाडीबद्दलही भाष्य केले.केंद्रीय यंत्रणा त्यांच्या अधिकारांचा वापर करत कारवाया करत असतात. माझ्याही नातेवाईकांवर मागच्या काळात धाडी टाकल्या होत्या. मंत्री अनिल परब यांच्यावर आज कारवाई सुरु असल्याची माहिती मिळाली. मागे तर काही नेत्यांनी अमक्याचा नंबर, तमक्यावर कारवाई असे सुतोवाच केले होते आणि त्यानंतर त्या – त्या व्यक्तींवर कारवाई झालेली आहे. अशा यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता पारदर्शकपणे कारवाई केली गेली तर कुणाचाही विरोध नाही. जसे राज्यसरकारच्या अखत्यारीत सीआयडी, ईओडब्ल्यू, लाचलुचपत विभाग आहे. त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते कारवाई करतात. तसेच केंद्रीय यंत्रणा देखील काम करतात. कायद्यानेच या यंत्रणांना अधिकार दिलेले आहेत. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा सर्वांची आहे असेही पवार म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही पसंत पडले नसेल. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना असे नेते काही बोलून जातात आणि माध्यमात तेच दाखवले जाते. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य केले पाहिजे. कुठलाही समाज किंवा महिलावर्गाच्या भावना दुखावल्या जातील, असे बोलता कामा नये, असे आवाहन पवार यांनी केले.आमचा प्रयत्न शेवटपर्यंत ऊसगळीताला जावा असा आहे. साखर आयुक्त लक्ष ठेवून आहेत. ऊस लागवडीची नोंद कृषी विभाग किंवा कारखान्यात केली गेली असती तर त्याच्यावर सरकारला तात्काळ निर्णय घेता आला असता.सध्या बीड, नांदेड,लातूर, जालना या जिल्ह्यात आणि सातारा येथील अंजिक्यतारा ऊस कारखान्याच्या परिसरात ऊस आहे. ऊस गळीताला जाईपर्यंत कारखाने बंद करु नये असे आदेश देण्यात आले आहेत असेही पवार यांनी सांगितले.