मुंबई नगरी टीम
मुंबई । बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज नव्या प्रभागांची आरक्षण सोडत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात आली.या बहुचर्चित प्रभाग आरक्षणात पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांना मोठा फटका बसला. त्यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष,माजी महापौर, विरोधी पक्षनेते आशा पालिकेतील बड्यांचा समावेश आहे.
मुंबईतील एकूण २३६ वॉर्डसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते. १५ जागा अनुसूचित जातील व २ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. ११८ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. पैकी ८ वॉर्ड अनुसूचित जातीच्या महिलांसाठी, १ वॉर्ड अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी तर १०९ वॉर्ड हे सर्वसाधारण महिलांसाठी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.आजच्या आरक्षणानुसार मुंबई पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा ११७ क्रमांक वार्ड सर्व साधारण महिलासाठी आरक्षित झाला आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ प्रभाग देखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे अमेय घोले, काँग्रेसचे नेते आणि मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा यांना आपला वॉर्ड गमवावा लागला आहे.शिवसेना नेते आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आरक्षण सोडतीत दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रभाग क्रमांक २०६ हा सर्वसाधारण राहिला आहे.