सरकारी योजना पोहचविण्याचे काम पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजे

मुंबई नगरी टीम

मुंबई । योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत,त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत.मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थीशी सह्याद्री अतिथीगृहातून दूरदश्यप्रणालीद्वारे संवाद साधतांना ते बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यानिमित्त मुख्यमंत्री बोलत होते.केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही ४० टक्के वाटा आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आहेत आणि लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते.प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५ लाख घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करू दिला आहे.याशिवाय पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत योजना (ग्रामीण व शहरी) इतर केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरीय यंत्रणाच्या सक्रीय सहभाग व नियोजनबद्ध अंमलबजावणीमुळे योजनांचा लाभ पोहोचविणे शक्य झाले असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना देखील केंद्राने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा परत सुरू करावा व लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी विनंती केली.केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगोदरच्या पिढ्यांनी लढा दिला आहे. आपल्या देशातल्या लोकांना समाधानाने जीवन जगता यावे म्हणून प्रयत्न करून या पिढ्यांचे योगदान सार्थ ठरवते अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Previous articleराज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी; माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा
Next articleमुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर ;२३६ पैकी ११८ प्रभाग महिलांसाठी राखीव