राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी; माजी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधील इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी उफाळली आहे.महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. आशिष देशमुख यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पक्षाध्यक्षांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे .

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या कॉंग्रेसच्या कोट्यातील एका जागेवर मुकुल वासनिक यांच्या ऐवजी उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली असून मुकुल वासनिक यांना राजस्थान मधून उमेदवारी देण्यात आली आहे.केंद्रीय हायकमांडच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत महाराष्ट्र कॉंग्रेस सरचिटणीस डॉ आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोनिया गांधी यांना पाठविला आहे. बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे.एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेस पक्षासोबत काम करत राहीन आणि वचनबद्धतेची पूर्तता करीन असे पत्र पाठवीत देशमुख यांनी आपला राजीनामा दिला आहे . माजी मुख्यमंत्री व सोनिया गांधी यांच्या विश्वासातील नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यासंदर्भात आपली नाराजी उघड केली आहे . प्रतापगडी यांच्या ऐवजी केद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील जेष्ठ कॉंग्रेस नेते मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून उमेदवारी द्यायला हवी होती अशी उघड नाराजी चव्हाण यांनी व्यक्त केली आहे .

Previous articleसांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘सावळ्या’ गोंधळामुळे मंत्र्यांना व्यक्त करावी लागली ‘ दिलगिरी’
Next articleसरकारी योजना पोहचविण्याचे काम पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजे