निवडणूक अटळ : तुरूगांत असलेले अनिल देशमुख,नवाब मलिक आणि एमआयएमची मते निर्णायक ठरणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.भाजपच्या उमेदवाराने या निवडणुकीतून माघार घेतली नसल्याने सहाव्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची आशा संपुष्टात आली आहे.सहावी जागा निवडून येण्यासाठी आता शिवसेनेला आणि भाजपला छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर अवलंबून रहावे लागणार आहे.सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपात थेट लढत होणार असल्याने अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचा भाव वधारला असल्याचे चित्र आहे.तर शिवसेनेचा दुसरा उमेदवार विजयी होण्यासाठी तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि एमआयएमचे दोन आमदार यांच्या मतांची आवश्यकता असून त्यावर त्यांचे विजयाचे गणित अवंलबून आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे.शिवसेना २,भाजप ३ आणि दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी पर्यंत मुदत होती.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून भाजपच्या उमेदवाराने राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.मात्र भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी माघारी घेण्याच्या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.त्यामुळे सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत अटळ आहे.राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप आमने सामने आल्याने या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे महत्व वाढले आहे.विधानसभेत १३ अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे १६ आमदार आहेत.राष्ट्रवादीचे ५३ आमदार असून,माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत.त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात अर्ज केला आहे.विधानसभेत शिवसेनेचे ५६ आमदार होते.शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या ५४ वर आली आहे.विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या सोमवारी अपक्ष आमदारांची वर्षावर बैठक बोलावली आहे.या बैठकीला किती अपक्ष आमदार उपस्थित राहतात यावर शिवसेनेच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.

विधानसभेत बहुजन विकास पक्ष ३, समाजवादी पार्टी २,एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मार्क्सवादी) १,शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य शक्ती पक्ष १.क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, असे छोट्या पक्षांचे एकूण १६ आमदार आहेत.तर विधानसबेत १३ अपक्ष आमदार आहेत.अपक्षांपैकी मंजूळा गावीत,चंद्रकांत पाटील,आशिष जैसवाल,नरेंद्र भोंडेकर,किशोर जोरगेवार,गीता जैन.संजय शिंदे आणि राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचे पाठबळ आहे.तर प्रकाश आवाडे,राजेंद्र राऊत, महेश बादली,विनोद आग्रवाल आणि रवी राणा हे अपक्ष आमदार भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.मनसेचे एकमेव आमदार असून,मनसे भाजपला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर प्रकाश आवाडे,राजेंद्र राऊत, महेश बादली,विनोद आग्रवाल आणि रवी राणा हे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.मनसेचे एकमेव आमदार असून,मनसे भाजपला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे भाजपकडे ११३ आमदारांचे पाठबळ आहे.या निवडणुकीत तुरूंगात असलेले दोन आमदार आणि एमआयएमचे दोन आमदार यांच्या मतावर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षांना तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून २९ आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत.भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी अधिकच्या १३ अधिक मतांची तर शिवसेनेला १४ मतांची गरज असेल.

विधानसभेतील संख्याबळ :
शिवसेना -५४
राष्ट्रवादी-५३
काँग्रेसचे -४४
बहुजन विकास आघाडी – ३
समाजवादी पार्टी – २
एमआयएम – २
प्रहार जनशक्ती पक्ष – २
कम्युनिस्ट पक्ष – १
स्वाभिमानी शेतकरी संघटना – १
मनसे – १
राष्ट्रीय समाज पक्ष – १
क्रांतीकारी शेतकरी पक्ष – १
जनसुराज्य शक्ती – १
शेतकरी कामगार पक्ष – १
अपक्ष -१३

महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदार
बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २ ,प्रहार जनशक्ती पक्ष २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ ,शेकाप १ ,क्रांतीकारी शेतकरी पक्ष १, कम्युनिस्ट पक्ष १ आणि ८ अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत.

भाजपकडे एकूण ११३ आमदार
भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १ आणि ५ अपक्ष आमदार आहेत.त्यामुळे भाजपकडे ११३ आमदार आहेत.

निवडणुकीत मतांचे गणित कसे आहे
सध्या विधानसभेत एकूण २८७ आमदार आहेत ( शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे २८७ सदस्य आहेत.) त्यामुळे एक जागा निवडून येण्यासाठी ४१.१ मतांची आवश्यकता आहे. त्यानुसार भाजपकडे ११३ मते असल्याने मतांपैकी ८४ मतांनी त्यांचे दोन खासदार निवडून येतील.यातून भाजपकडे एकूण २९ मते शिल्लक राहत असल्याने भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी अजून १३ मतांची गरज आहे.राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार दिल्यामुळे त्यांच्या दोन्ही जागा सहजपणे निवडून येऊ शकतील तर शिवसेनेचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.तिस-या जागेसाठी शिवसेनेकडे १३ मते शिल्लक राहतात.दोन्ही काँग्रेसची मिळून १५ मते शिल्लक राहतात.महाविकास आघाडीला १६ इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे.त्यामुळे शिवसेनेला अजून १४ मतांची गरज भासणार आहे.

Previous articleमंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय:आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट दुसऱ्या वर्षाच्या अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणार
Next article“जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला” : पंकजा मुंडे झाल्या भावुक