मुंबई नगरी टीम
मुंबई । येत्या १० जून रोजी होणारी राज्यसभेची निवडणूक चुरशीची होणार असून,महाविकास आघाडी आणि भाजपने छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर लक्ष केंद्रीत केले असतानाच आज महाविकास आघाडीच्या महत्वपूर्ण बैठकीला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ( माकप) आमदार विनोद निकोले यांच्यासह विधानसभेतील १३ पैकी ११ अपक्ष आमदारांनी हजेरी लावल्याने हे अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात आपले मत टाकणार असल्याची चर्चा आहे.
राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपने तीन उमेदवार उतरविल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी छोटे पक्ष अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. तर आज मुंबईतील एका पंचतारांकित हॅाटेल मध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे निरिक्षक मल्लीकार्जून खरगे यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित होते.या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढले आहे.हे आमदार कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आज झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेतील १३ पैकी १० अपक्ष आमदारांनी हजेरी लावल्याने हे अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.श्यामसुंदर शिंदे,संजय शिंदे,गीता जैन,नरेंद्र भोंडेकर,आशिष जैसवाल,चंद्रकांत पाटील,विनोद आग्रवाल,किशोर जोरगेवार,मंजुळा गावीत,राजेंद्र यड्रावकर आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ( माकप) आमदार विनोद निकोले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटेनेतून निलंबित केलेले आमदार देवेंद्र भुयार, उपस्थित होते.महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती आणि समाजवादी पार्टीने पाठिंब्याबाबत आपली भूमिका अजून स्पष्ट केली नाही.बहुजन विकास आघाडी,एमआयएम कोणती भूमिका घेणार यावर महाविकास आघाडीच्या सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.