मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.विधानसभेच्या अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर हे विजयी झाले आहेत.राहुल नार्वेकर यांच्या बाजून १६४ तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांच्या बाजूने १०७ मते पडली.समाजवादी पक्ष आणि एमआयएम पक्षांनी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे उशीरा आल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेता आला नाही.तर कॅाग्रेस आणि राष्ट्रवादीचे १० सदस्य गैरहजर होते.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारली असली तरी उद्या होणारी बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याठी विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे.अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे- फडणवीस सरकारने बाजी मारली असून, अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेचे राजन साळवी यांचा पराभव केला.राहुल नार्वेकर यांच्या बाजूने १६४ सदस्यांनी तर राजन साळवी यांच्या बाजूने १०७ सदस्यांनी मतदान केले.या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि एमआयएम पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली. राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे उशीरा आल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेता आला नाही.माजी मंत्री अनिस देशमुख आणि नवाब मलिक हे तुरूंगात असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते गैरहजर होते.राष्ट्रवादीचे सदस्य बबन शिंदे,निलेश लंके,तर भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असल्याने मतदान प्रक्रियेत भाग घेवू शकले नाहीत.कॅाग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि एमआयएमचे मुफ्ती इस्माईल हे गैरहजर होते.कॅाग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा आज विवाह होता त्यामुळे तेही गैरहजर होते.शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह अपक्ष आमदार आणि बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांनी नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले.
अध्यक्ष निवडीच्या अगोदर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी प्रवेश सभागृहात प्रवेश करताच आनंद दिघे यांचा विजय असो,जय भवानी जय शिवाजी, वंदे मातरम अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले.मतदान सुरू असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची मतदानाची वेळ येताच,विरोधी बाकावरील सदस्यांनी एका सूरात ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’असा संवाद म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.तर भायखळाच्या आमदार यामिनी जाधव उभे राहताच ईडी ईडी अशा घोषणा दिल्या.राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या अग्निपरिक्षेच्या पहिल्या दिवशी सभागृहात सत्ताधारी बाकावर पहिल्याच रागेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शेजारी गुलाबराव पाटील त्यांच्या शेजारी उदय सामंत यांना स्थान देण्यात आले होते.त्यांच्या शेजारी भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना स्थान देण्यात आले होते.विशेष म्हणजे शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका पार पाडणारे भरत गोगावले आणि दीपक केसरकर यांना पाठीमागील रांगेत स्थान देण्यात आले होते. विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल सुरेश नार्वेकर यांची निवड निवड झाल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,जयंत पाटील आणि कॅांग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,नाना पटोले यांच्यासह सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी नार्वेकर यांना अध्यक्षांच्या आसनावर नेऊन स्थानापन्न केले.