शिंदे-फडणवीसांचा मविआला दुसरा दणका; राज्यपालांना पाठवणार १२ जणांची नवीन यादी

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडीच्या सरकारने आरे मधील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र काल स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करून महाविकास आघाडीला धक्का दिला असतानाच आज शिंदे-फडणवीस सरकारने मविआला दुसरा दणका देण्याचा निर्णय घेतला आहे.महाविकास आघाडीने राज्यपालांना पाठवलेल्या विधान परिषदेत रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या यादीला स्थगिती देत नवीन यादी पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर ६ नोव्हेंबर २०२० रोजी विधान परिषदेत रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. मात्र गेल्या दीड वर्षांपासून राज्यपालांनी यादीवर कोणताही निर्णय घेतला नाही.आता राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यावर आता राज्य सरकार १२ जणांची नवीन यादी राज्यपालांना पाठवणार असल्याचे समजते.महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, राजू शेट्टी,यशपाल भिंगे, आनंद शिंदे तर काँग्रेसच्या रजनी पाटील,सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन,अनिरुद्ध वनकर यांची तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर,नितीन बानगुडे पाटील,विजय करंजकरचंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.रजनी पाटील या राज्यसभेवर गेल्याचे त्यांचे नाव वगळण्यात आले होते तर राजू शेट्टी यांचे नाव रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली होती.मात्र राज्यपालांनी या यादीला अद्यापही मंजूरी दिली नाही. आता शिंदे – फडणवीस सरकारकडून १२ जणांची यादी देण्यात येणार आहे.

Previous articleशिंदे -फडणवीस सरकार किती दिवस टिकणार ? जयंत पाटलांनी केली भविष्यवाणी
Next articleअध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी,काँग्रेस,एमआयएमच्या आमदारांनी मारली दांडी