शिंदे -फडणवीस सरकार किती दिवस टिकणार ? जयंत पाटलांनी केली भविष्यवाणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडीची सत्ता जाताच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे कालच एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असतानाच हे सरकार किती दिवस चालणार यांची भविष्यवाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही,असे विधान त्यांनी केले आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्याप एक दिवसाचा कालावधी उलटला नसला नाही तोच हे सरकार फार काळ टिकणार नाही,असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.भाजपला माहित आहे की हा प्रासंगिक करार आहे.शिंदे- फडणवीस सरकार किती दिवस टिकणार आणि २०२४ ला ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही,याबाबत शंका आहे असेही पाटील यांनी सांगून त्यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील असा अंदाज वर्तवला आहे.अशा निवडणुका लागल्यास हे सगळे निवडून येतील किंवा नाही,याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचे हे,भाजप ठरवेल,असेही पाटील म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे आम्हाला देखील कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कळले. मागच्या चार निवडणुकीत पवार यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती मागविण्यात आली आहे. पवार यांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागाने जर निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना तिथून मिळाले असती परंतु जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरु असल्याची टीकाही पाटील यांनी केली.महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे.सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथे -जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु, असेही पाटील म्हणाले.

संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीच्या शेवटी ईडीचे दिल्लीतील अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावे लागेल. कारण याआधी आमचे देखील नेते दिवसा चौकशीला गेल्यानंतर त्यांची रात्रीपर्यंत चौकशी चालली आणि रात्री उशीरा त्यांच्या अटकेच्या बातम्या येतात. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही,अशी अपेक्षा आपण करुयात असेही पाटील म्हणाले.

Previous articleशिंदे-फडणवीस सरकार दोन चाकी स्कुटर ; हँडल मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात
Next articleशिंदे-फडणवीसांचा मविआला दुसरा दणका; राज्यपालांना पाठवणार १२ जणांची नवीन यादी