मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर हा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानाच शिवसेनेने खासदार भावना गवळी यांना लोकसभेतील मुख्यप्रतोद पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.गवळी यांच्या ऐवजी खासदार राजन विचारे यांची लोकसभेतील मुख्यप्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे त्यासंदर्भातील पत्र दिले आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. शिवसेना आमदारांच्या बंडानंतर खासदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात खासदारांची बैठक बोलावली होती.या बैठकीला खासदार भावना गवळी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे गैरहजर होते.खासदार भावना गवळी या शिवसेनेवर नाराज असल्याने त्या शिंदे गटाकडे जाण्याची चर्चा होती.या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देवून शिवसेनेच्या लोकसभेतील मुख्यप्रतोद खासदार भावना गवळी यांची शिवसेनेच्या मुख्यप्रतोदपदावरून हटवून त्यांच्या जागी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती केल्याचे कळविले आहे.एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत ठाण्याचे खासदार राजन विचारे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र त्यांनी शिवसेनेत राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येते.भावना गवळी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.या पार्श्वभूमीवर त्या शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा होती.त्यामुळे त्यांच्याकडील मुख्यप्रतोदपद काढून घेतल्याची चर्चा आहे.