उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवणार होते..राठोड यांचा गौप्यस्फोट

मुंबई नगरी टीम

यवतमाळ । राज्यसभा निवडणुकीच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह सुरत गाठल्यानंतर बंड झाल्याची बातम्या वा-यासारखी पसरली.बंड झाल्यावर कृषीमंत्री दादा भुसे.पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि मी वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो होतो.त्यावेळी त्यांना बंडखोरी केलेल्या आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली.त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे सुरतला पाठवण्याचा निर्णय त्यांनी गेतला होता.मात्र संजय राऊत हे शिंदे यांच्या विरोधात खूपच बोलायला लागले आणि आदित्य ऐवजी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना पाठवण्याचा निर्णय झाला असा गौप्यस्फोट माजी मंत्री संजय राठोड यांनी केला.

राज्यसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सुरतला गेल्यावर शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याचे स्पष्ट झाले.शिवसेनेच्या आमदारांच्या या बंडानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता.एकनाथ शिंदे यांच्यासोबत दाद भुसे,गुलाबराव पाटील आणि संजय राठोड असल्याची चर्चा होती. मात्र आम्ही मुंबईतच होतो.आमदारांच्या बंडानंतर गुलाबराव पाटील,दादा भुसे आणि मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. शिंदे यांचे काय काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्याची विनंती यावेळी ठाकरे यांना केली होती.बंड केलेले सर्व आमदार आपलेच आहेत.त्यांनी एवढे वर्षे शिवसेनेसाठी रक्त सांडवले आहे. त्यांचे काय म्हणणे आहे हे एकदा ऐकून घ्यावे अशी विनंती आम्ही ठाकरे यांना केली.आमचे म्हणणे ठाकरे यांना पटल्यांनतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवण्यास तयार झाले होते, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.

आमच्याशी झालेल्या चर्चेनुसार उद्धव ठाकरे हे शिंदे गटाशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना सुरतला पाठवणार होते.बंडखोर आमदारांना परत आणण्याची खात्री आम्ही देतो,असेही आम्ही त्यांना सांगितले होते.मात्र संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंशी काय दुश्मनी होती ? बंडानंतर संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खूपच बोलायला लागले.दुस-या दिवशी आदित्य यांच्या ऐवजी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना सुरतला पाठवण्याचा निर्णय झाला.हे दोघे सुरतकडे निघाले असतानाच इकडे एकनाथ शिंदेंचा पुतळा जाळला गेला असे सांगून,संजय राऊत यांनीच कळ लावली,असा आरोप राठोड यांनी केला.महाविकास आघाडीसोबत शिवसेना गेली नसती तर आज शिवसेनेवर ही वेळ आली नसती, असेही राठोड म्हणाले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी नसून,त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर नाराजी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.आम्ही आजही शिवसैनिक असून,कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. आमच्यासाठी पुन्हा मातोश्रीची दारे उघडल्यास आम्ही पुन्हा मातोश्रीवर जाऊ, असेही राठोड यांनी सांगितले.

Previous articleखासदार भावना गवळींना शिवसेनेचा दणका ; मुख्यप्रतोद पदावरून हटवले
Next articleकिरीट सोमय्यांकडून शिंदे यांचा उल्लेख ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे माफिया मुख्यमंत्री