मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येवून अजून एक आठवड्याचाही कालावधी उलटला नसताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या उल्लेखामुळे भाजप आणि शिंदे गटात ठिणगी पडली आहे.सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचा मापिया मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. त्यावर आता दिपक केसरकर यांच्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला गर्भित इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील आपल्या कार्यालयात प्रवेश करून प्रत्यक्ष कामकाज सुरू केल्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.या भेटीनंतर सोमय्या यांनी ”मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माफिया मुख्यमंत्रीना हटवल्याबद्दल अभिनंदन असे ट्विट केले होते. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केल्याने शिंदे गटातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. किरीट सोमय्या यांनी केलेल्या या टिकेवर बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमय्या यांचा चांगलाच समाचार घेतला आहे,आता शिवसेना संपली हे सोमय्यांनी समजू नये, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा – शिवसेना युती म्हणून काम करत आहेत. आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आमची श्रद्धा नाही,असा समज करून घेऊ नये. यापुढे सोमय्यांनी अशी वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा गर्भित इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.