चिन्हाचे खेळ करण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या ; उद्धव ठाकरेंचे आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई । धनुष्यबाण चिन्हाबाबत कोणताही संभ्रम ठेवू नका.धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना पक्षाचे आहे. या वादावर न्यायालयात लढाई सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय जो काही लागेल तो लागेल. पण धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे.अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला ठणकावत या वादाला पूर्णविराम दिला आहे.चिन्हाचे खेळ करण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या,आम्ही चुकलो असू तर जनतेचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल,असेही त्यांनी सुनावले.

शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह शिदे गटाला मिळणार अशी चर्चा होती.पक्षाच्या चिन्हावरून शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू होवून नव्या वादाला तोंड फुटले होते.या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेवून धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना पक्षाचे असल्याचे त्यांनी शिंदे गटाला ठणकावले आहे.धनुष्यबाणाबाबत कोणताही संभ्रम ठेवू नका.धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे.या वादावर न्यायालयात लढाई सुरू असल्याने न्यायालयाचा निर्णय लागेल तो लागेल. पण धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे असे ठाकरे यांनी सांगितले.कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.लोक नुसते धनुष्यबाण चिन्ह बघत नाहीत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाचे चिन्ह लोक बघतात.त्यामुळे आम्हाला नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही. घटनात्मक चर्चा करुनच मी ही ठामपणे सांगत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.पक्षात एक आमदार असो की पन्नास असो, आमदार गेले तर पक्ष संपत नाही, कारण आमदार गेले तरी पक्ष जाऊ शकत नाही.त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे असेही ठाकरे म्हणाले. चिन्हाचे खेळ करण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या,आम्ही चुकलो असू तर जनतेचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिवसेनेकडे जे आमदार आहेत त्यांना धमक्या आणि आमिषे दाखविली जात असली तरी ते बधले नाहीत.आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, न्यायालयात जो काही निकाल लागेल, तो निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे, लोकशाहीची ताकद किती राहिली आहे हे संपूर्ण जग बघत आहे.या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे असेही ठाकरे म्हणाले.ज्यांनी शिवसेनेवर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय, त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आहात हे जनतेला कळू द्या, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेसाबद्दलही भाष्य केले.गेल्या दोन तीन दिवसात शिवसेनेतून इतके नगरसवेक गेले,तितके नगरसेवक गेले अशा बातम्या येत आहेत. मुळात महानगरपालिका, अस्तित्वात नाही, ते त्यांचे वैयक्तिक कार्यकर्ते असू शकतात,त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूनला ठेऊन यांच्या शिफारशीमुळे मी त्यांना उमेदवारी दिली.पण राज्यातील आज मातोश्रीवर सर्वसाधारण व्यक्ती येत आहेत.शिवसेनेने आजपर्यंत साध्या माणसांना मोठं केले. साधी माणसे जोपर्यंत शिवसेनेसोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला कोणीही धोका पोहोचवू शकत नाही असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

Previous article‘अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही ‘ : शिंदे गटाच्या आमदाराचा भाजपला गर्भित इशारा
Next article९२ नगरपरिषदा, ४ नगरपंचायतीसाठी १८ ऑगस्टला निवडणूक : वाचा- निवडणूकीचा कार्यक्रम आणि कोणत्या नगरपरिषद,नगरपंचायतीची निवडणूक होणार