मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेला मोठा हादरला बसला असतानाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती करून भविष्यात शिंदे गटाशी आणि भाजपशी जुळवून घेण्याची मागणीही केल्याचे समजते.
शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर काही खासदार बंडाच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती.येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचीही कानोसा या बैठकीत घेण्यात येणार होता.या बैठकीला लोकसभेतील १९ खासदारांपैकी १२ खासदार उपस्थित होते.तर ७ खासदार गैरहजर होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी या या बैठकीला उपस्थित नव्हते,संजय जाधव,संजय मंडलिक,हेमंत पाटील,कृपाल तुमाने आणि दादरा-नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर याही गैरहजर होत्या.राज्यसभेतील खासदार संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी या बैठकीला उपस्थित होते तर अनिल देसाई हे दिल्लीला असल्याने अनुपस्थित राहिले होते.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यास संजय राऊत यांच्यासह काही खासदारांचा विरोध असल्याचे समजते तर काही खासदारांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचे मत मांडल्याचे सांगण्यात येते.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येते.एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी अनेक खासदारांनी केल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याचे बोलले जात आहे.शिवसेनेने यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका या बैठकीत राऊत यांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान या बैठकीत बहुतांश खासदारांनी भविष्यात भाजप आणि शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे असल्याचे समजते.एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास चर्चेची दारे उघडी राहतील असे मत खासदारांनी व्यक्त केल्याची सांगण्यात येते.देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली असून, आपण त्याच्या सोबत राहिले पाहिजे, अशी भावनाही काही खासदारांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले आमदार आजही मनाने आपलेच आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही जुळवून घेतले पाहिजे भाजप आणि शिंदेंशी जुळवून घेतले तर भविष्यात पक्षाच्या हिताचे ठरेल अशीही चर्चा या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येते.