मोठी बातमी : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था तसेच,सध्याची परस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी आणि हवामान खात्याने दिलेला इशारा विचारात घेता राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

राज्यातील निवडणूकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या ३२ हजार ७४३ एवढी असून,पैकी ७ हजार ६२० इतक्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थापैकी नामनिर्देशन सुरू असणाऱ्या ५६३६ इतक्या सहकारी संस्था आहेत.तर नामनिर्देशन सुरू नसलेल्या १९८४ इतक्या संस्था आहेत.बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून त्यांची सदस्य मोठी आहे.राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था तसेच, सदर परस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता,जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी निर्माण संस्था तसेच,ज्याप्रकरणी सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Previous articleसत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही
Next articleतुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून कधीच विश्वासात घेतलं नाही,मला आणि मुलाला अपमानीत केलं