मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.या दोघांचा शपथविधी होवून एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार होवू शकला नाही.ही राज्याच्यादृष्टीने मोठी शोकांतिका आहे अशा असे सुनवतानाच मंत्रिमंडळ विस्तारासाठी किती दिवस दिल्लीत जाऊन स्वतः चा अपमान करुन घेत आहात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.
राज्यात शिंदे सरकार येवून महिन्याचा कालावधी होत असला तरी विस्तार करण्यात आला नाही.यावरून आता विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.विरोधी पक्षनेते अजित पवार,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विस्तारावरून शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.सरकार स्थापन झाल्यानंतर ९० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर साडेआठ लाख हेक्टरवरील शेतीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही.मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या नावाखाली त्यांना सारखंसारखं दिल्लीला जावं लागत आहे. दिल्लीश्वरांची मर्जी राखावी लागत आहे.तरीदेखील दिल्लीतून मंत्रीमंडळ विस्ताराचा हिरवा कंदील मिळत नाही असे सांगून,किती दिवस दिल्लीत जाऊन स्वतः चा अपमान करुन घेत आहात असा सवाल तपासे यांनी केला आहे.शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रीमंडळाचा विस्तार करु शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही तपासे म्हणाले.