मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील शिंदे सरकारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी होणारी सुनावणी आता येत्या बुधवारी होणार आहे.या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता गुरूवारी म्हणजे ४ ऑगस्ट होणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून एक महिन्याचा कालावधी उलटला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला नाही.मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सोमवारी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी होणार होती.त्यामुळेच २ किंवा ३ ऑगस्टला विस्तार होणार असल्याचे सांगितले जात होते.मात्र आज होणारी सुनावणी आता येत्या बुधवारी होणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार हा आता येत्या गुरूवारी ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगितले जात असल्याने विस्तार हा सुनावणीमुळे अडकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी होणा-या सुनावणीवर राज्यातील शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.