मुंबई नगरी टीम
मुंबई । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची खिल्ली उडवली.उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक आहे, असा खोचक टोलाही अजित पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावला.
विदर्भ,मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर येथिल शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.एक महिना उलटला तरी मंत्रीमंडळ विस्तार नाही.हा विस्तार कशात अडकळा हे कळायला मार्ग नाही.त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही की त्यांच्याकडे आमदार संख्या वाढल्याने विस्तार होत नाही असा चिमटाही पवार यांनी काढला.उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक आहे असा खोचक टोलाही पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावला. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया ऐकली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी त्यांच्या मोठ्या बैठकीत त्यांनी चर्चा करून आढावा घेतला.तुम्ही विचार करा,त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ खुर्च्या असतात. बाकीच्या खुर्च्या या दोघांकडे बघत असतात,ते काय करतात हे पाहत असतात.त्यामुळे त्यांच्यावर रिकाम्या खुर्च्यांचे टेन्शन असते. आपण दोघांनी काही चुकीचे करू नये बरं. काही चुकीचे करू नये बरं, असे ते या रिकाम्या खुर्च्यांना पाहून म्हणत असतात,अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची खिल्ली उडवली.
मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत.उपमुख्यमंत्री यांना खातंच दिलेलं नाही त्यामुळे त्यांना कसलेही अधिकार नाहीत.प्रत्येक फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे जात आहेत.मात्र सहीअभावी फाईली थांबल्या आहेत.सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही असा टोलाही त्यांनी लगावला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकारच दिलेला नाही.राज्यसरकारचे अधिकार गतीने व्हायला हवे व जनतेची कामे झाली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे असेही पवार म्हणाले.कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.मुख्यमंत्री मिरवणूका, सत्कार, सभा घेत आहेत. आता तर रात्रीच्याही सभा घेत आहेत. दहानंतर सभा घेत नाही तो एक नियम आहे हा नियम सर्वांना मान्य हवा. राज्याचा प्रमुखच नियम तोडत आहेत तर पोलीस अधीक्षक काय करणार. अक्षरशः घटना पायदळी तुडवत असतील तर काय करणार असा उद्विग्न सवालही पवार यांनी केला.