मुंबई नगरी टीम
मुंबई । गेल्या सव्वा महिना रखडलेल्या शिंदे -फडणवीस सरकारच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून,येत्या रविवारी राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.येत्या रविवारी होणा-या शपविधी सोहळ्याची जय्यत तयारी राजभवनात सुरू आहे.या विस्तारात भाजपच्या आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी आठ आमदारांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होवून एका महिन्यापेक्षा जास्तचा काळ लोटला असला तरी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधकांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.सर्वोच्च न्यायालयात आज होणा-या सुनावणीनंतरच विस्ताराबाबत निर्णय घेतला जाईल असे बोलले जात होते.मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्ली दौ-यावर रवाना झाले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवारी दिल्ली दौ-यावर जाणार आहेत.दिल्लीत होणा-या आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.राज्यपाल रविवारी सकाळी पुन्हा मुंबईत येणार असून,दुपारच्या सुमारास राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे समजते.यात शिंदे गटाचे आणि भाजपच्या प्रत्येकी ८ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती आज एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.संभाव्य मंत्र्यांची यादी तयार असून, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.ज्या अर्थी दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत,त्यावरून यादी अंतिम झाल्याचे म्हणता येईल,असेही केसरकर यावेळी म्हणाले.
या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता ?
येत्या रविवारी होणा-या विस्तारात भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांना तर शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई,संजय शिरसाट, अब्दुल सत्तार,संदीपान भुमरे,गुलाबराव पाटील,दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.