मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांच्या मतदार संघात दौ-यांचा सपाटा लावला होता.शिवाय सततची धावपळ,सभा आणि प्रशासकीय कामाच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे.या कारणास्तव मुख्यमंत्र्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.थकवा आल्याच्या कारणास्तव मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.मुख्यमंत्र्यांना थकवा जाणवत असला तरी चिंता करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या उपचार करमा-या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर केलेल्या बंडापासून त्यांच्या गटातील आमदारांना प्रथम सुरत त्यांनतर गुवाहाटी आणि गोवा या ठिकाणी घेवून जाण्यापासून ते राज्यातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात व्यस्त राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी पाच वेळा दिल्लीचे दौरे केले.शिवाय राज्यातील पुरस्थिती यामुळे त्यांनी राज्याच्या काही भागात दौरे करून परिस्थितीची पाहणी केली.सत्कार समारंभ, शिंदे गटातील काही आमदारांनी मुंबईत येवून केलेले शक्ती प्रदर्शन आदी कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावली होती.बंडखोरी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत गेली दीड महिना ते व्यस्त आहेत.त्यातच प्रत्येक आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेत त्यांनी मोठे निर्णयही घेतले. या धकाधकीत त्यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्याने पुण्याच्या दौ-यानंतर त्यांना थकवा जाणू लागल्याने त्यांनी आजचे आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले.गुरुवारी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.तसेच दोन-तीन दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित प्रशासकीय बैठका, कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांची मोठ्या प्रमाणात दगदग आणि धावपळ झाली. अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाला भेटी देण्याबरोबरच त्यांचे विविध कारणाने राज्यभर दौरे झाले. या काळात त्यांनी कोणतेही विश्रांती घेतली नाही. या काळात त्यांची अनेकदा झोपही नीट झाली नव्हती. त्यामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत असल्याने सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Previous articleयेत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ! भाजप- शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांना मिळणार संधी
Next articleराज्यातील २५ जिल्हा परिषद आणि २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगित