Cabinet expansion : उत्तर महाराष्ट्र,मराठवाड्याला झुकते माप;संजय राठोड,अब्दुल सत्तारांना संधी

मुंबई नगरी टीम

मुंबई । अखेर चाळीस दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.राजभवनातील दरबार हॅाल मध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या आणि शिंदे गटातील प्रत्येकी ९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.विशेष म्हणजे आज शपथ देण्यात आलेले सर्वच्या सर्व कॅबिनेट मंत्री आहेत.शिंदे-फडणवीस सरकारच्या या विस्तारात महिला आमदारांना संधी देण्यात आली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात असतानाच वादग्रस्त आमदार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नसल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्याने या विस्तारावरून आता मानापमान नाट्याला सुरूवात झाली आहे.मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

चाळीस दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार आज पार पडला.राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या एकूण १८ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील,सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत पाटील,डॉ.विजयकुमार गावित,गिरीष महाजन,रवींद्र चव्हाण,मंगलप्रभात लोढा,अतुल सावे,सुरेश खाडे,यांना तर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील,दादा भुसे,संजय राठोड,संदीपान भुमरे,उदय सामंत,तानाजी सावंत,अब्दुल सत्तार,दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई,यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.विशेष म्हणजे कालच आरोप करण्यात आलेले अब्दुल सत्तार आणि वादग्रस्त संजय राठोड यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.या विस्तारात भाजप आणि शिंदे गटाकडून एकाही महिला आमदारांचा समावेश करण्यात आला नसल्याने नाराजीचा सुर होता.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ देणारे संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नसल्याने त्यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे.विस्तारावरून विरोधकांनी शिंदे आणि फडणवीस यांना लक्ष्य केल्याने आज झालेल्या विस्तारात महिला आमदारांचा समावेश करण्यात आला नसला तरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणा-या दुस-या विस्तारात महिला आमदारांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

आजच्या विस्तारात प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला झुकते माफ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटील,नंदुरबार जिल्ह्यातील विजयकुमार गावित,जळगाव जिल्ह्यातील गिरीष महाजन,शिंदे गटाचे आणि जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील आणि नाशिक जिल्ह्यातील दादा भुसे असे एकूण ५ मंत्री उत्तर महाराष्ट्रातील आहेत.तर औरंगाबादचे संदीपान भुमरे,अब्दुल सत्तार,अतुल सावे यांच्यासह उस्मानाबादचे तानाजी सावंत यांना विस्तारात संधी देवून शिंदे आणि फडणवीस यांनी शिवसेनेला तगडे आव्हान देण्यासाठी मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे.विदर्भातून भाजपने सुधीर मुनगंटीवार तर शिंदे गटाने संजय राठोड यांना संधी दिली आहे.पश्चिम महाराष्ट्रातून शंभूराज देसाई यांना तर भाजपकडून चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडे यांना संधी देण्यात आली आहे.शिंदे गटाकडून कोकणातून उदय सामंत आणि दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली असली तरी भाजपकडून कोणाचीही समावेश करण्यात आला नसल्याने कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाने सामंत आणि केसरकर यांच्यावर जबाबदारी सोपविल्याची चर्चा आहे.मुंबईतून मगलप्रभात लोढा आणि डोंबिवलीतून रविंद्र चव्हाण यांना संधी देण्यात येवून प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आजच्या विस्तारात १८ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात आला असला तरी एकाही महिला आमदारांचा किंवा राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला नाही.यामुळे भाजपच्या काही महिला आमदारांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली होती.विस्तारात मुंबई मधून अनेक नावे चर्चेत होती मात्र आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून केवळ मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे तर आमदार आशिष शेलार यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही.शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचा समावेश झाला नसला तरी आपण नाराज नसल्याचे त्यांनी सांगितले.विस्ताराचा हा पहिला टप्पा झाला आहे.पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल.आमच्याबरोबर उठाव करताना जे आले होते,त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली आहे.दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांचा समावेश केला जाईल असे सांगून मुख्यमंत्री शिंदेंवर माझी कोणतीही नाराजी नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleगेल्या सव्वा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ३९९ फाईल्सचा निपटारा
Next articleविस्तारात महिलांना डावलले :सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची करून दिली आठवण