मुंबई नगरी टीम
मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.काल झालेल्या विस्तारात संजय राठोड यांना शिंदे गटातून कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्यात आल्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.मात्र मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच संजय राठोड यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.या प्रकरणात यापुढे कोणी काही माझ्यावर आरोप केले तर कायदेशीर पाऊल उचलले,असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
संजय राठोड यांचा शपथविधी होताच विरोधकांसह भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला होता.शपथविधी झाल्याने त्यांनी यावर त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.मात्र आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना टीकाकारांना प्रत्युत्तर देत,यापुढे या प्रकरणी यापुढे कोणी काही माझ्यावर आरोप केले तर कायदेशीर पाऊल उचलले,असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.मी चार वेळा आमदार झालो आहे.गेल्या वेळी मला मंत्रीपदाची संधी मिळाली होती आणि आताही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.एक दुर्देवी घटना झाली त्यावरून आरोप करण्यात आले.त्यावेळी नैतिक जबाबदारी समजून,निष्पक्ष चौकशी व्हावी याकरीता उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला.या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी मला क्लीन चिट दिली आहे.या चौकशीच्या माध्यमातून सर्व बाबी मांडलेल्या आहेत,असेही मंत्री राठोड यावेळी म्हणाले.गेली काही दिवस मी आणि माझे कुटुंब मानसिक तणावात होतो.माझे राजकीय जीवन उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला.पोलिसांनी या प्रकरणात राजपत्र प्रकाशित केले आहे.त्यात मी निष्कलंक असल्याचे आणि त्यात मी सहभागी असल्याचे कुठेही आढळले नाही. म्हणून मला मंत्रीपदाची शपथ देण्यात आली असल्याचे राठोड यांनी सांगून,आतापर्यंत मी शांत होतो मात्र आता यापुढे असे आरोप केल्यास कायदेशीर मार्ग अवलंबवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.