मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली आता खाते वाटप केव्हा जाहीर होणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला असला तरी आज झालेली शिंदे मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही खाते वाटप विना पार पडली.विस्तार होवून एक दिवसाचा कालावधी उलटला असला तरी खाते वाटप जाहीर झाले नसल्याने मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांचा जीव टांगणीला लागला आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी खाते वाटप जाहीर केले जाण्याची शक्यता होती.मात्र ते जाहीर करण्यात आले नाही.आता उद्या गुरूवारी दुपारनंतर खाते वाटप जाहीर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१८ मंत्र्यांचा शपथविधी होवूनही मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर केले नसल्याने भाजपसह शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये धाकधुक आहे.आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या बैठकीपूर्वी खाते वाटप जाहीर केले जाण्याची शक्यता होती.त्यानंतर या बैठकीनंतर खाते वाटप जाहीर केले जाईल असे सांगण्यात येत होते.मात्र रात्री उशीरापर्यंत खाते वाटप झाले नाही.भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील,सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत पाटील,डॉ.विजयकुमार गावित,गिरीष महाजन,रवींद्र चव्हाण,मंगलप्रभात लोढा, अतुल सावे,सुरेश खाडे तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील,दादा भुसे,संजय राठोड,संदीपान भुमरे,उदय सामंत,तानाजी सावंत,अब्दुल सत्तार, दीपक केसरकर,शंभूराज देसाई यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. खाते वाटप जाहीर झाले नसल्याने मंत्रालयातील दालन वाटप आणि बंगले वाटप रखडले आहे.आता खाते वाटपाला उद्या म्हणजेच गुरूवारचा मुहर्त सापडल्याची चर्चा आहे.त्यामुळे उद्या गुरूवारी दुपारनंतर खाते वाटप जाहीर केले जाणार असल्याचे समजते.

Previous articleयापुढे कुणी आरोप केले तर कायदेशीर कारवाई करणार : संजय राठोड यांचा इशारा
Next articleदेवेंद्र फडणवीस नागपूरचे तर उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री ?