मुंबई नगरी टीम
मुंबई । महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
गृहमंत्री अमित शाह जी, शिंदे गुट के विधायक महाराष्ट्र विधानभवन परिसर में सरेआम मविआ विधायकों के बारे में हिंसक वक्तव्य कर के उन्हें धमकाने का काम कर रहे है।@AmitShah @Dev_Fadnavis pic.twitter.com/YCCpkV7to3
— Supriya Sule (@supriya_sule) August 24, 2022
५० खोके..एकदम ओक्के…गद्दार आला अशा घोषणाबाजीमुळे हैराण झालेल्या शिंदे आणि भाजपच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पाय-यांवर निदर्शने करून शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करून लक्ष्य केले.त्यांच्या या घोषणा सुरू असतानाच विरोधी पक्षाच्या आमदारांनीही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने अभूतपूर्व प्रसंग उद्भवला आणि सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले.यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी एकमेकाविरोधात भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.त्यानंतर झालेल्या राड्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना एक ट्वीट केले आहे.शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरामध्ये खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांच्याबाबत हिंसक वक्तव्य करुन त्यांना धमकावण्याचे काम करत असल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ही घटना निदर्शनास आणून दिली आहे.