मुंबई नगरी टीम
सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली.उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे,ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे.एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की,सुटत नाही असा हल्लाबोल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान दोनशे जागा जिंकू.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून द्यावे असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
बावनकुळे हे सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रवास करत असून त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी टोला लगावला.तत्पूर्वी सकाळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी टोला लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे, असे विचारले असता त्यांनी ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे, असे उत्तर दिले.एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की, सुटत नाही, असेही ते म्हणाले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे.आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे. आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रसेच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी, असाही टोलाही बावनकुळे यांनी हाणला.
प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे म्हणून विश्व हिंदू परिषद, शिवप्रतापगड उत्सव समिती,हिंदू एकता आंदोलन अशा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली.मतांच्या राजकारणासाठी आणि लांगुलचालनामुळे उद्धव ठाकरे सरकारला हे अतिक्रमण काढण्याची हिंमत झाली नाही.पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अतिक्रमण हटविले याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले.प्रतापगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण सरकारला विनंती करू, असेही ते म्हणाले.सातारा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युती असेल व युतीचाच नगराध्यक्ष होईल.भाजपाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढतील व विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.