मुंबई नगरी टीम
मुंबई । वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारमुळेच राज्याच्या बाहेर गेला असल्याचा आरोप युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला होता.त्यांच्या या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देवून राज्याच्या बाहेर गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली.या समितीत दोन निवृत्त सनदी अधिकारी यांचा समावेश असून,ही समिती दोन महिन्यात आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल,अशीही माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी केली.उद्योगमंत्री सामंत यांच्या या घोषणेमुळे राज्यातील प्रकल्प नक्की कुणामुळे बाहेर गेले याचा उलघडा येत्या काही दिवसात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेवून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता.यावेळी त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेदांता फॉक्सकॉनचे अघ्यक्ष अनिल अगरवाल यांना लिहिलेले पत्र सादर केले होते.शिवाय २९ ऑगस्टला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेली बैठक नेमकी कशासाठी होती ? वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प या राज्यात ठेवण्यासाठी होती की दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी होती असा सवाल त्यांनी केला होता.आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला उद्योगमंत्री सामंत यांनी पत्रकार परिषद घेवून जोरदार प्रत्युत्तर दिले.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली बैठक ही हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी घेतली होती या आदित्य ठाकरे यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे सामंत म्हणाले.वेदांता प्रकल्पासंदर्भात दाओसला बैठक झाली.मात्र वेदांताबाबत सामंज्यस करार झाला नव्हता तशी कुठेही नोंद नसल्याचे सामंत यांनी सांगितले.तसेच दाओसला मध्ये जे करार करण्यात आले त्यातील उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण नसल्याचे सांगत आहेत असेही सामंत म्हणाले.गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात प्रकल्प येत नाहीत असे वातावरण निर्माण केले जात आहे. सिनार्मस संदर्भात झालेला करार हा डावोसला झाला होता.मात्र करार झाला म्हणजे उद्योग आला असे होत नाही. काल जमीन वाटपाचे देकार पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात आला होता.वेदांतासंदर्भात २४ मे २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती.जूनमध्ये दिल्लीत बैठक झाली,पण त्याचे इतिवृत्त नसल्याचेही सामंत यांनी सांगितले. वेदांत फॉक्सकॉन संदर्भात करार झाला नव्हता असे सांगतानाच,येत्या काळात राज्यात ५० हजार कोटींचे प्रकल्प येणार असून ३० हजार कोटींचे करार झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मागील तीन महिन्यांपासून नकारात्मक वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करतानाच मागील तीन वर्षात राज्यातील उद्योग कोणामुळे बाहेर गेले याची चौकशी करण्यासाठी माजी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा सामंत यांनी केली.या समितीत दोन निवृत्त सनदी अधिकारी यांचा समावेश असणार असून,ही समिती आपला अहवाल दोन महिन्यात राज्य सरकारला सादर करणार असल्याचे सामंत म्हणाले.
राज्याबाहेर गेलेले प्रकल्प हे शिंदे फडणवीस सरकारच्या काळात राज्याबाहेर गेले नसून,महाविकास आघाडीच्या काळात गेले असल्याचे सामंत यांनी सांगून भविष्यात दिडपट सामंजस्य करार झालेले दिसतील असे त्यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदा घेवून केवळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.राजकीय भांडणामुळे उद्योग राज्या बाहेर जायला नको असे सांगतानाच आदित्य ठाकरे हे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात माहिती व तंत्रज्ञान विभागात काय घडले हे जाहीर करू असा इशारा त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.कोकणात होणा-या तेलशुद्धीकरण प्रकल्पावरून खासदार विनायक राऊत यांनी सामंत यांच्यावर आरोप केले होते.येथिल जमीन सामंत यांनी शहा,मिश्रा यांना घ्यायला लावली होती असा आरोप केला आहे.त्याच्या या आरोपालाही सामंत यांनी उत्तर देत असा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यास मी राजकारण सोडेल मात्र यात तथ्य नसल्यास राऊत यांनी राजकारण सोडावे असे आव्हानही सामंत यांनी दिले.