शिवशक्ती भिमशक्तीला टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे-जोगेंद्र कवाडे एकत्र येणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई । एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला युतीचा प्रस्ताव दिली असता वंचित आघाडीने युतीसाठी होकार दिला असतानाच शिवशक्ती भिमशक्तीला टक्कर देण्यासाठी शिंदे गट आणि माजी खासदार जोगेंद्र कवाडे एकत्र येणार आहेत.यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांच्यात चर्चा झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना खिळखिळी झाली आहेत.अशात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला प्रकाश आंबेडकर यांनी साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला युतीचा प्रस्ताव देवून या दोन पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला युतीसाठी होकार दिला. या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती भिमशक्ती एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.एकीकडे शिवशक्ती भिमशक्ती एकत्र येत असतानाच या आघाडीला टक्कर देण्यासाठी शिंदे गटानेही जोरदार तयारी सुरू केली आहे.पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांनी सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.मंत्रालयातील या भेटीनंतर कवाडे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत त्यांच्या वाहनाने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गेले.वर्षावर या दोन नेत्यांमध्ये एकत्रित येण्याबाबत सुमारे तासभर चर्चा झाली.त्यामुळे माजी खासदार जोगेंद्र कवाडे हे लवकरच शिंदे गटासोबत जाणार असल्याची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येते.

Previous articleराज्यातील प्रकल्प कुणामुळे बाहेर गेले ? सत्य दोन महिन्यात जनतेसमोर येणार
Next articleबिल्डर अजय आशर यांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा