भूखंडाचा श्रीखंड….विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम; विरोधी पक्षाच्या आमदारांची घोषणाबाजी

मुंबई नगरी टीम

नागपूर । नागपूरातील भूखंड घोटाळ्याप्रकरण आणि महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी विरोधी पक्षाच्या आममदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी केली.

विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यावर जोरदार घोषणाबाजी करीत नागपूरातील भूखंड घोटाळ्याप्रकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.कर्नाटकच्या दादागिरी विरोधातही बोम्मई सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. नागपूरातील भूखंड घोटाळ्याप्रकरण, महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवरही घोषणा देण्यात आल्या.महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत.सीमावाद प्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे.पण कर्नाटकच्या या दादागिरीसमोर राज्यातील ईडी सरकार मात्र अळिमिळी गुपचिळी आहे, अशी टीका यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे पण केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. कर्नाटक सरकार जाणीवपूर्वक दादागिरी करत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भारतीय जनता पक्षाचेच सरकार आहे. पण कर्नाटकची दंडेलशाही ते मोडून काढू शकत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक झाली होती पण त्यानंतरही कर्नाटककडून अरेरावी केली जात आहे. हे सर्व केंद्र सरकारच्या आशिर्वादानेच चालले आहे. महाराष्ट्र तोडण्याचा भाजपा व नरेंद्र मोदी यांचा हा डाव आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातील ईडीचे सरकार डरपोक आहे. कर्नाटक सरकारला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे असे पटोले यावेळी म्हणाले.

Previous articleभाजपच्या आमदारांने छगन भुजबळांना बनवले ‘सांताक्लॅाज’ ; उपमुख्यमंत्र्यांनी टोचले कान !
Next articleभुजबळ म्हणाले…मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी ! मनीषा चौधरी छगन भुजबळांना नडल्या