काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबेंची माघार ! मुलगा सत्यजित तांबे भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणार ?

मुंबई नगरी टीम

नाशिक । काँग्रेसने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने या मतदार संघातून काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.विशेष म्हणजे या मतदार संघातून भाजपने उमेदवार दिला नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.तर अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे.

नाशिक,अमरावती पदवीधर,औरंगाबाद,नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारीला मतदान होणार असून गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातून काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.मात्र सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा करूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्यजित तांबे यांची जवळीक वाढली आहे.शिवाय या मतदार संघातून भाजपकडून सत्यजित तांबे ही निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच नाशिक विभाग पदवीधर मतदार हा भाजपच्या वाट्याला जावूनही भाजपने येथून उमेदवार दिला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले असल्याने सत्यजित तांबे भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात घडलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.राजकीय समीकरणात पुढे काय-काय होतेय ते बघू मात्र जी घटना घडली आहे ते योग्य नसल्याचे सांगत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.माघारी संदर्भात अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी हा निर्णय का घेतला याची कल्पना नाही.मात्र तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून हा निर्णय घेतला का ? याची माहिती घेतली जाईल असेही स्पष्ट केले.

Previous articleसहा महिन्यात २० हजार १८६ अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती;मानधनवाढ,विम्यासह मोबाईल मिळणार
Next articleसत्यजीत तांबेंचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक ! फडणवीस म्हणाले योग्य वेळी निर्णय घेवू