भाजपा राज्यभरात ‘मोदी @ ९’ अभियान राबवणार : आ. प्रविण दरेकर यांची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला येत्या ३० मे रोजी ९ वर्ष पूर्ण होत आहेत.यानिमित्ताने देशभरासह महाराष्ट्रात ‘मोदी @ ९’ हे महासंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा विधानपरिषदेचे गटनेते आमदार आणि या अभियानाचे संयोजक प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच या अभियानात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणा-या उपक्रमाची माहिती यावेळी आमदार दरेकर यांनी दिली.

दरेकर म्हणाले की, ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला ९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशभरात ‘मोदी @ ९’ महासंपर्क अभियान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात राबवित येणार आहे. या निमित्ताने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात आणि २८८ विधानसभा मतदारसंघात विविध प्रकारचे कार्यक्रम,उपक्रम राबविण्याचा संकल्प या अभियानात आहे. ४८ लोकसभा क्षेत्रामध्ये ४८ जाहीर सभा होणार आहेत.ज्यामध्ये केंद्रातील मंत्री, देशातील वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री,प्रदेशाध्यक्ष व आमदार,खासदारांचा समावेश असेल. ४८ लोकसभा क्षेत्रात पत्रकार परिषदा होतील.त्याचबरोबर सोशल मीडियावरील जे प्रभावी व्यक्तिमत्व आहे त्यांच्याशी संपर्क होईल. समाजातील जी प्रभावी व्यक्तिमत्व आहेत जसे क्रिकेटपट्टू, साधूसंत, समाजसेवक, गायक, कलाकार यांच्याशीही संपर्क होणार आहे.याची जबाबदारी श्वेता शालिनी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.जे समाजाला दिशा देणारे काम करतात अशांचे संमेलन घेऊन त्यांच्याशी वार्तालाप होणार आहे. याची जबाबदारी विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर विधानसभेनुसार व्यापारी संमेलन,लाभार्थी संमेलन, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे, आघाड्या आहेत त्यांचे संमेलन,पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे संमेलनही होणार आहे आणि याची जबाबदारी आमदार जयकुमार रावल, खासदार अनिल बोन्डे, खासदार धनंजय महाडिक व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

‘विकासार्थ तीर्थ’या अभियानाद्वारे मोदी सरकारच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रात खासदारांच्या पुढाकाराने, केंद्राच्या माध्यमातून जी विकासकामे झाली आहेत त्या कामांचा पाहणी दौरा जनतेसोबत लावून तेथील प्रकल्पची माहिती द्यावी, अशा प्रकारचा कार्यक्रम असून याची जबाबदारी आ. राणा जगजीतसिंह यांना देण्यात आल्याचे दरेकर म्हणाले. तसेच या अभियानाचा प्रारंभ ३० मे रोजी होणार असून ३० व ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरंभ सभा होणार आहे. ही सभा मंडलशः स्क्रीन लावून व्हर्च्युअल उपस्थिती मोठ्या संख्येने असणार आहे. याची जबाबदारी ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर असणार आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. तसेच २३ जून रोजी जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बूथ समितीची बैठक घेऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पंतप्रधान मोदी कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधणार असून याची जबाबदारीही आ. निरंजन डावखरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या अभियानाचा शेवटच्या टप्प्यात २० जून ते ३० जून ‘घर घर संपर्क’ अभियान राबविणार येणार आहे. या अभियानात केंद्रीय पदाधिकाऱ्यांपासून ते बूथ स्तरापर्यंत जे जे लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांचा समावेश संपर्क अभियानात असणार आहे.९ वर्षात पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून झालेली लोककल्याणकारी कामे घरोघरी पत्रकं पुस्तिकेच्या माध्यमातून घेऊन जायचे आहे. याची जबाबदारी युवा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व आ. श्रीकांत भारतीय यांच्यावर असणार आहे. हे अभियान पक्षाने गांभीर्याने घ्यायचे आहे अशा प्रकारचे आदेश व सूचना राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्या आहेत. पक्षपातळीवर हा विषय गांभीर्याने घेऊन सर्वांना काम करायचे आहे, असेही जे. पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे दरेकर म्हणाले.

विधानसभा क्षेत्रात जागतिक योगदीन साजरा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने २१ जून हा दिवस जागतिक योगदीन म्हणून साजरा केला जातो. या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात या निमित्ताने योगा संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याची जबाबदारी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Previous articleराज्यातील ‘या’ जेल मधिल कैद्यांना नातेवाईकांशी बोलण्यासाठी मिळणार “स्मार्ट फोन”
Next articleप्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे किंवा इतर पक्षांसोबत न जाता भाजपसोबत यावे