मुंबई नगरी टीम
मुंबई । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या एका गटाने सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर अखेर काँग्रेस पक्षाने दावा केला आहे.विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावावर श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेवून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्याची विनंती केली असून,त्याची अधिकृत घोषणा उद्या ( बुधवारी ) केली जाईल.विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी संग्राम थोपटे यांनी प्रयत्न केले होते मात्र त्यांना संधी मिळाली नाही.तर दुसरीकडे आज काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली या भेटीवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते.नाना पटोले हे दिल्लीत असल्याने उपस्थित राहू शकले नसल्याचे स्पष्टीकरण विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दिले.
विधानसभेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते.राष्ट्रवादीच्या बंडानंतर विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने ( शरद पवार गट ) दावा केला होता. मात्र विधानसभेत काँग्रेस पक्षाचे ४५ सदस्य असल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी मागणी काँग्रेसने केली होती.त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला तसेच विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला दावा पाठीमागे घेतल्याने आज काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेवून विधानसभा विरोधी पक्षनेता नियुक्तीबाबतचे पत्र काँग्रेस पक्षाच्या वतीने सोपविण्यात आले.यावेळी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , मुंबई काँग्रेस कमिटी अध्यक्षा वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत असल्याने आज उपस्थित राहू शकले नाहीत असे थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
विजय वडेट्टीवार हे विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून,त्यांनी ठाकरे सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे.तसेच २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीला तीन महिने बाकी असताना त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही प्रभावीपणे काम केले होते.काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी असे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिल्याने त्यांच्या नियुक्तीची घोषणा आज बुधवारी विधानसभेत केली जाईल.दुसरीकडे या पदासाठी संग्राम थोपटे हे इच्छूक होते मात्र दिल्लीत वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने संग्राम थोपटे यांच्यासह काँग्रेस पक्षातील काही आमदार नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. तर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.