मुंबई नगरी टीम
पाली (राजस्थान ) । राजस्थान ही महाराणा प्रताप यांची पवित्र भूमी आहे. पण, गहलोत यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने राजस्थान हा अत्याचार आणि भ्रष्टाचारात क्रमांक एकवर आणून ठेवला,अशी घणाघाती टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राजस्थान भाजपाच्या वतीने परिवर्तन यात्रांचे आयोजन विविध भागात केले आहे. या परिवर्तन यात्रेत आज देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आणि त्यांनी पाली, सोजत, जैतारन, ब्यावर विधानसभा मतदारसंघांमध्ये जाहीर सभा, स्वागत सभांना संबोधित केले. या यात्रेत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, परशुरामगिरी महाराज, सहप्रभारी विजया रहाटकर, पी. पी. चौधरी, राजेंद्र गहलोत आणि इतर नेते उपस्थित होते. आज राजस्थान सरकार केंद्र सरकारकडून निधी घेते आणि त्याच निधीचा भ्रष्टाचार करतात. मग केंद्र सरकारवरच टीका करतात. गहलोत यांनी राजस्थानला पहिल्या क्रमांकावर आणले. पण, बलात्कार, अत्याचार आणि भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आणले. महाराणा प्रतापांच्या भूमीवर हे अजीबात शोभनीय नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, या देशातून भ्रष्टाचार संपविण्याचे काम मोदीजींनी केले आणि गरिब कल्याणाच्या अनेक योजना राबविल्या. या योजनांमधून दिल्लीतून पाठविलेला पै न् पै आता गरिबांच्या खात्यात जात आहे. भारताला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे काम मोदींनी केले. अर्थव्यवस्था विस्तारते म्हणजे रोजगार वाढतो, लोकांच्या हाती पैसा येतो आणि लोककल्याणासाठी सुद्धा सरकारच्या हाती पैसा येतो. पायाभूत सुविधांच्या कामाला गती येते. आज जगात भारताचा गौरव वाढविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.जेव्हा भारताचा जगात गौरव वाढतो आहे, तेव्हा राहुल गांधी मात्र विदेशात जाऊन चीनचे कौतूक करीत होते. बाहेर जाऊन आपल्याच देशाची निंदा करणारा नेता असू तरी शकतो का? अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते. पण, ते विदेशात जाऊन भारताची भूमिका मांडत होते, असे सांगून फडणवीस म्हणाले की, काही लोक सनातन धर्माला संपविण्याचा प्रयोग करु पाहत आहेत. या नेत्यांची विधाने ही संयोग अजीबात नाही. सनातन धर्म तर कधी संपणार नाही. पण, जो हा विचार करतील, त्यांना संपविण्याचे काम या देशातील जनता मतदानातून करेल. आम्ही खुर्चीसाठी नाही तर देशकल्याणासाठी राजकारण करतो.