मुंबई नगरी टीम
मुंबई । काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून शनिवारी ते राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.बाबा सिद्दीकी यांचा मुलगा बांद्रा पुर्वेचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हे सुद्धा सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.अजित पवार गटाकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेस घराण्याशी एकनिष्ठ असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील काँग्रेसचे बडे प्रस्थ आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.त्यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून,शनिवारी ते राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.पक्ष सोडण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही.याबाबत मी वरिष्ठांना पंधरा-वीस दिवसापूर्वीच कळवले होते, असेही बाबा सिद्दीकी यांनी सांगितले.बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि बांद्रा पुर्वेचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या राजीनाम्याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला असला तरी आमदार झिशान सिद्दीकी हे अजित पवार सामिल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) काँग्रेसला मुंबईत मजबूत करण्यासाठी मुस्लिम चेह-याची आवश्यकता होती.फेब्रूवारी महिन्यात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून बाबा सिद्दीकी यांना संधी दिली जावू शकते असेही चर्चा आहे.