राज्यात मेगा भरती ! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात १५ हजार पोलीस भरती करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस दलात २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहे.या भरतीमध्ये २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या भरतीमध्ये २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.या भरतीमध्ये १० हजार ९०८ पोलीस शिपाई,२३४ पोलीस शिपाई चालक,२५ बॅण्डस् मॅन, २ हजार ३९३ सशस्त्री पोलीस शिपाई,५५४ कारागृह शिपाई व कारागृह शिपाई ही पदे क गट संवर्गातील आहेत.पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर ( तत्काळ मुल्याकंन होणारी ) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची असल्याने पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो.पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी,तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली होती.

Previous articleवाहतूक कोंडीतून सुटका होणार !  दहिसरचा टोल नाका स्थलांतरित करणार
Next articleरेशन दुकानदारांना १५० रुपयांऐवजी १७० रुपये नफा मिळणार