पोलीसांच्या गृह प्रकल्पांसाठी ‘आयआयटी’चे सहकार्य

पोलीसांच्या गृह प्रकल्पांसाठी ‘आयआयटी’चे सहकार्य

मुंबई, दि. २९ पोलीस विभागाच्या इमारती तसेच गृहप्रकल्पांस तांत्रिक सहकार्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) मुंबईबरोबर सामंजस्य करार केला आहे.

पोलीस गृहनिर्माण महामंडळाने पोलीसांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्याचे ठरविले आहे. ही घरे जलदगतीने पूर्ण व्हावीत, यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून त्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार तांत्रिकदृष्ट्या मजबूत, दीर्घकाळ टिकणाऱ्या, कार्यपूरक व हरित इमारत संकल्पनेनुसार सौदर्यदृष्ट्या आकर्षक असे बांधकामाचे आराखडे ‘आयआयटी’ तयार करणार आहे. त्याशिवाय तांत्रिक परीक्षण,इमारतीच्या आराखड्याची तपासणी पद्धती, कामाची तपासणी व त्याचे समीक्षण करणे,आधुनिक किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आदी तांत्रिक बाबींबाबत‘आयआयटी’ मार्गदर्शन करणार आहे.

पोलीसांसाठी सदनिका, पोलीस विभागाच्या प्रशासकीय इमारती, पोलिस ठाणी,कारागृहे आदींचे बांधकाम या महामंडळाच्यावतीने करण्यात येते. हे काम जलदगतीने व्हावे, असा या सामंजस्य करारामागील उद्देश आहे. सध्या राज्यात महामंडळामार्फत मोठे ३६ प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये ३ हजार ३४४ सदनिका, १ हजार ६५२ क्षमतेची ८ वसतिगृहे, ११ पोलिस ठाणी, ४० वर्गखोल्यांच्या ६ इमारती, ९ प्रशासकीय इमारती, १ समादेशक कार्यालय, ४ कौशल्य विकास केंद्रे आणि १ महासंचालनालयीन कर्मचाऱ्यांसाठी शिबीर कार्यालय इमारतीचा समावेश आहे.

पोलिस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. डी. मिश्रा यांनी या करारासाठी पुढाकार घेतला असून महामंडळाचे मुख्य अभियंता डॉ. महेश डेकाटे आणि ‘आयआयटी’चे प्रा. रवी सिन्हा हे अंमलबजावणी करणार आहेत.

Previous articleप्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Next articleमहिलांचा सन्मान राखण्यासाठी कोपर्डीचा निकाल महत्त्वपूर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here