शनिवारी आणि रविवारी जिल्हा सहकारी बँका व प्रमुख बॅका सुरू राहणार
वाणिज्यिक बँका शनिवार आणि रविवारी कर्जमाफीच्या कामासाठी सुरु
मुंबई : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी १९ हजार ५३७ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. (यात वन टाईम सेटलमेंट साठीची ४ हजार ६७३ कोटी रुपयांची रक्कम समाविष्ट आहे) ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामास वेग देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया च्या महाराष्ट्रातील सर्व शाखा उद्या शनिवार ९ डिसेंबर आणि रविवारी १० डिसेंबर सुरु राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये शासनाने बँकांना शनिवारी आणि रविवारी बँका सुरु ठेऊन पात्र खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या कामाला गती देण्याची विनंती केली होती, त्यास बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बँक आणि जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. ज्या खातेदारांच्या बँक खात्यात कर्जमाफीची, वन टाईम सेटलमेंटची तसेच प्रोत्साहन लाभाची रक्कम जमा झाली आहे त्या शेतकऱ्याला याची माहिती मिळेल, हेही बँकांनी सुनिश्चित करावे,असे निदेशही मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र खातेदारांची यादी बँकांना देण्यात आली आहे. बँकांनी या खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. काही बँकांनी यात खुप चांगले कामही केले आहे. त्यांचे अभिनंदन करून इतर बँकांनीही या कामाला गती द्यावी अशी सूचनाही परदेशी यांनी यावेळी दिली.