शेतक-यांच्या आत्महत्या हे विरोधकांचे पाप
मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल
नागपूर: गेल्या १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात यांनी शेतक-यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचेच काम केले असून, शेतक-यांच्या आत्महत्या हे याचेच पाप आहे असा हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांवर केला.
विधानसभेत आज कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजचे सर्व कामकाज रद्द करून कर्जमाफीवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र त्यांचा हा प्रस्ताव नाकारल्याने विरोधकांनी सभागृहात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “नही चलेंगी नही चलेंगी दादागिरी नही चलेंगी” भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा देवून सभागृह दणाणून सोडले. कर्जमाफीची रक्कम अजूनही शेतक-यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याने ती केव्हा होणार हे मुख्यमंत्र्यांनी शंभर रूपयाच्या स्टॅप पेपरवर लिहून द्यावे अशी मागणी करत सरकारच्या घोषणांवर शेतक-यांचा विश्वास राहिला नसल्याची टीका त्यांनी केली.
विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी केलेल्या टिकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवर हल्लाबोल केला. हेच सत्तेवर असताना यांनी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून, शेतक-यांच्या आत्महत्या या तुमचेच पाप आहे असा हल्ला चढवला.शंभर रूपयाच्या काय हजार रूपयाच्या स्टॅप पेपरवर कर्जमाफीची विस्तृत माहिती देतो असे मुख्यमंत्री यांनी सांगत, ४१ लाख शेतक-यांना कर्जमाफी दिल्याचे स्पष्ट करत, विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे, असा टोला लगावला.बोंडआळी प्रादुर्भावासंदर्भात संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत देणार असल्याचे सांगत विरोधकांचे हे ‘मगर मच्छचे आसू’ आहेत चर्चेच्या वेळी दुध का दुध पाणी का पाणी करू असे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिल्याने हे अधिवेशन शेतक-यांच्या प्रश्नावर वादळी ठरणार आहे.