मुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत नौटंकी करीत असल्याचा हल्लाबोल

मुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत नौटंकी करीत असल्याचा हल्लाबोल

पैसे कोणाच्या खात्यात गेले-धनंजय मुंडेंचा सवाल

विधान परिषद दिवसभरासाठी तहकुब

नागपुर :  कर्जमाफीच्या घोषणेला सहा महिने होऊनही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकांच्या न्यायालयामार्फत नोटीसा येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला त्या पिंप्रीबुटी गावातील शेतकऱ्यालाही कर्जमाफी मिळाली नाही. मग मुख्यमंत्री कर्जमाफी झाली म्हणुन  जाहिर करतात ते कोट्यावधी रूपये कोणाच्या खात्यात गेले असा सवाल करीत मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत नौटंकी करीत असल्याचा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केला.

हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी  विधान परिषदेचे कामकाज सूरू होताच धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी, बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, हमीभाव, सक्तीने होणारी विज बिलाची वसुली, ओखी वादळामुळे झालेले नुकसान, खरेदी केंद्र सुरू नसणे आदी मुद्दांसंबंधी स्थगन प्रस्ताव उपस्थित करुन दिवसभराचे कामकाज बाजुला ठेवुन या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली.  स्वत:ला गतीमान म्हणुन घेणऱ्या सरकारला सहा महिन्यात कर्जमाफीची अंमलबजावणी करता आली नाही. कर्जमाफी नंतर १ हजार ५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पुसागोंदी येथील शेतकरी ज्ञानेश्वर राठोड यांना कर्ज वसुलीसाठी बँकेने कोर्टा मार्फत पाठवलेली नोटीस मुंडे यांनी वाचुन दाखवली. मुख्यमंत्र्यांनी ज्या घरात मुक्काम केला त्या विष्णु धुमने या पिंप्रीबुटी गावातील शेतकऱ्यास आजही कर्जमाफी मिळाली नाही तो शासनाच्या मॅसेजची वाट पाहत असल्याचे मुंडे म्हणाले. पंतप्रधानांनी चाय पे चर्चा केलेल्या दाभाडी गावातील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप करीत  मुख्यमंत्र्यांचे  शेतकऱ्यांबाबतीतील प्रेम हे केवळ नौटंकी चालु असल्याचा आरोप केला.

कापुस, बोंडअळीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील शेतकरी उध्दवस्त झाला आहे. पंचनामे होत नाहीत, पंचनामा करणारे अधिकारीही कुठे दिसले नाहीत आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे मंत्री ही कुठे दिसले नसल्याचे मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांनी नावे टाकुन दिलेल्या बोडअळीची बोंडे ही त्यांनी सभागृहात सादर करून सरकार शेतकरी विरोधी असल्याचा घणाघात केला.

महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नौटंकी या शब्दावर आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला या गोंधळात सभागृहाचे कामकाज चार वेळेला तहकुब करावे लागले. सदर शब्द तपासुन घेऊ असे आश्वासन सभापतींनी दिल्यानंतर ही विरोधकांनी चर्चेसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले.

 

Previous articleशेतक-यांच्या आत्महत्या हे विरोधकांचे पाप
Next articleराहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला खरे अच्छे दिन येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here