……जेव्हा परिवहन मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा वाट चुकतो

.…..जेव्हा परिवहन मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा वाट चुकतो

नागपूर : राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिका-यांच्या सावळ्या कारभाराचा सामना करावा लागला. येथिल रविभवन येथे परिवहनमंत्री यांचे निवासस्थान असून, हकेच्या अंतरावर असणा-या सुयोग या पत्रकारांच्या निवासस्थानी पोहचताना त्यांच्या वाहनांचा ताफा प्रमुख रस्त्यांवरून फे-या मारत होता.अखेर २० मिनिटांच्या अवधी नंतर मंत्री महोदय सुयोग निवासस्थानी पोहचले.

राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा करण्यासाठी सकाळी ९:३० वाजता सुयोग या निवासस्थानी येणार होते. रविभवन येथिल निवासस्थानावरून मंत्री महोदयांचा ताफा वेळेत निघाला. परिवहन मंत्र्यांच्या वाहनासोबत पोलीसांसह, आरटीओचे अधिकारी सुध्दा होते. मात्र हकेच्या अंतरावर असलेल्या सुयोग येथे पोहचण्या ऐवजी रावते यांचा ताफा मुख्य रस्त्यांरून गिरट्या घालत होता. विशेष म्हणजे त्यांच्या वाहन चालकासह , पोलीस अधिकारी आणि आरटीओच्या अधिका-यांना ‘सुयोगचा’ पत्ताच माहित नव्हता. शेवटी २० मिनिटे भटकंती केल्यानंतर परिवहन मंत्र्यांचा ताफा सुयोग निवास्थानी पोहचला.

पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिका-यांच्या सावळ्या कारभाराचा सामना करावा लागल्यानंतर परिवहनमंत्री रावते आणि पत्रकारांमधिल गप्पा रंगल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच सर्व सुविधायुक्त अशी “लालपरी” एसटी दाखल होत आहे. विविध सुविधांमुळे जास्तीत जास्त प्रवासी यामधून प्रवास करतील त्यामुळे आपोआपच खाजगी प्रवाशी वाहतूक आपोआपच बंद होईल असा दावा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे.

यापुढे एसटी महामंडळातील चालक वाहकांच्या कामाच्या वेळांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणा-या बस पोर्टचे डिझाईन तयार असून, पनवेल बस पोर्टची निविदा लवकरच निघणार असल्याची माहिती परिवहनमंत्री रावते यांनी दिली. रिक्षा परवाने सर्वासाठी खुले करण्यात आल्याने काही रिक्षा संघटनांनी हे परवाने बंद करण्याची मागणी केली होती अशीही माहिती त्यांनी देवून आरटीओ कार्यालयातील आधुनिकीकरण आणि इतर सुविधा या खात्याच्या बजेटला ३० टक्के कात्री लावल्याने रखडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एसटी महामंडळाच्या बॅकेतुन महामंडळाच्या कर्मचा-यांनी १२०० कोटी रूपयाचे आत्तापर्यंत कर्ज घेतले असल्याची माहिती रावते यांनी दिली.

Previous articleराज्यातील ४४४ धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट
Next articleमुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावच नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here