महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ‘माझी कन्या भाग्यश्री’ अभियान पुढे ढकलले
मुंबई : मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या उद्देशाने उद्या बुधवारी (ता. 3 जानेवारी) पुणे येथे २५ हजार मुलींच्या उपस्थितीत भव्य अशा जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .परंतु कार्यक्रमात सहभागी होणा-या मुलींची सुरक्षितता आणि महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर लोकभावनांचा आदर करून महिला व बाल विकास विभागाने हा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे कळविले आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव (जि. सातारा) या जन्मगावापासून या योजनेच्या जाणीव जागृती अभियान रथयात्रेचा शुभारंभ करण्यात येणार होता, तसेच ही रथयात्रा पुढे मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे जन्म गावी वनंदगाव,रत्नागिरी,पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी जिल्हा अहमदनगर मार्गाने राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे समारोप होणार होता, तोही कार्यक्रम वरील पार्श्वभूमीवर पुढे ढकलत असल्याचे कळविण्यात आले आहे. हे दोन्ही कार्यक्रमाची तारीख नंतर कळविण्यात येणार असल्याचे महिला व बाल विभागाने कळविले आहे.