कारवाई केलेल्या ठिकाणांची आयुक्त पुन्हा पाहणी करणार

कारवाई केलेल्या ठिकाणांची आयुक्त पुन्हा पाहणी करणार

आमदार नितेश राणे यांच्या भेटीनंतर आयुक्तांनी दिले आश्वासन

मुंबई : कमला मिल आग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईला न जुमानता अवघ्या चोवीस तासात कारवाई केलेले पब्स, बार आणि हुक्का पार्लर पुन्हा सुरू झाले. त्यामुळे महापालिकेला प्रामाणिकपणे कारवाई करायची आहे  की फक्त धुळफेक करायची आहे? असा सवाल आ. नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईतील पब्स, रेस्टाॅरन्टस आणि बारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने केलेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांची महापालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेअंती महापालिका आयुक्तांनी कारवाई झालेल्या ठिकाणांची पुन्हा पाहणी करण्याचे आश्वासन राणे यांना दिले.

मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह या दोन पब्सला २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दोन्ही हॉटेल्सनी अग्नी सुरक्षा विषयक नियमांचे पालन न केल्याची बाब अग्निशमन दलाच्या अहवालातून उघड झाली होती. त्यानंतर महापालिकेने मुंबई शहर तसेच उपनगरातील हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली होती. मात्र यापैकी अनेक हॉटेल्समधील कारवाई होऊन चोवीस तास उलटायच्या आतच अनधिकृत बांधकामे पुन्हा नव्याने उभी राहिल्याचे दिसून आले होते. परिणामी महापालिकेच्या कारवाई वरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याच मुद्द्यावर गुरूवारी आ. नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती देताना राणे म्हणाले की, एवढी मोठी दुर्घटना होऊनही महापालिकेला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. महापालिकेच्या कारवाईची भीती आता हुक्का पार्लर, पब्स आणि हाॅटेल मालकांना अजिबात राहिली नाही हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. कमला मिल घटनेनंतरही अद्याप अग्नीसुरक्षेचा कुणीही गांभीर्याने विचार करत नाही. महापालिकेच्या कारवाईनंतर अवघ्या चोवीस तासात जर तोडलेली बांधकामे पुन्हा उभी राहत असतील, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पत्र देऊनही जर कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे केल्याचे ते म्हणाले. त्यावर तोडलेल्या बांधकामांची पुन्हा पाहणी करण्याचे आयुक्तांनी आपल्याला आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या हॉकर्स  झोनविषयी विचारले असता ते म्हणाले की, आमच्या घराला लागूनच शाळा आहे. तरी देखील तिथे हॉकर्स झोन तयार करण्यात आला आहे. मातोश्री समोर फेरीवाले कसे उभे करायचे हे आम्हाला देखील माहीत असल्याचे ते म्हणाले. तुम्ही गरीब फेरीवाल्यांचा वापर आमच्या विरोधातील राजकारणासाठी करत आहात, यावरून आपल्या राजकारणाची पातळी कळते असा टोलाही त्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

Previous articleनाशिक मध्ये भुजबळ समर्थकांची बैठक
Next articleनांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफ ला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here