मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाशच्या पेपरची फेरतपासणी

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाशच्या पेपरची फेरतपासणी

वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय देण्याची कृषिमंत्र्यांनी दिली ग्वाही

मुंबई : मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे यानी सहायक कृषी अधिकारी पदासाठी २०१३ मध्ये परीक्षा दिली होती. त्याच्या मागणीनुसार याबाबत फेरतपासणी करून त्याना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सांगितले.

कृषिमंत्र्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी अविनाश शेटे यांना दुपारी दोनच्या सुमारास मंत्रालयात आपल्या दालनात बोलावून घेतले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी अविनाश सोबत त्याचे वडील देखील उपस्थित होते. अविनाशची कैफियत ऐकून घेतल्यानंतर कृषिमंत्र्यांनी  कृषी आयुक्तालयाला दूरध्वनीवरून सुचना देत याप्रकरणाची फाईल सोमवारी मंत्रालयात घेऊन येण्याचे निर्देश दिले.अविनाशला वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय मागण्यासाठी आत्महत्या हा काही मार्ग होऊ शकत नाही. असा राग डोक्यात घालू नकोस, तुला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. जीव लाखमोलाचा आहे, अशा शब्दात त्याची समजूत काढली. अविनाशच्या म्हणण्यानुसार २०१३ मध्ये त्याने दिलेल्या सहायक कृषी अधिकारी पदाच्या परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले. यावेळी दिलेल्या पेपरची फेरतपासणी करावी अशी मागणी त्यानी केली. त्यानुसार त्याच्या पेपरची फेरतपासणी करण्याचे कृषिमंत्र्यांनी सूचना दिल्या.

यावेळी कृषीमंत्र्यांनी अविनाशची आस्थेने चौकशी करून पुन्हा असा मार्ग पत्करू नको असे सांगितले. सुशिक्षित व्यक्तीने असे पाऊल उचलू नये याचा पुनरुच्चार करीत त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही  दिली.

Previous articleरायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहतांना हटवले
Next articleअखेर तुकाराम मुंढे यांची बदली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here