धनंजय मुंडे पक्ष आणि जनता तुमच्या पाठीशी
सुनिल तटकरेंनी दिला विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी धनंजय मुंडेच्या समर्थनार्थ सभागृह दणाणून सोडले
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा लावून धरत आरोप करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आणि विधीमंडळाच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नचिन्हावर गंभीर चर्चाही केली.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी सभागृहाच्या कामकाजाबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा आजचा काळा दिवस होता असे सांगितले. रामायणामध्ये सीतेला अग्नीपरिक्षेला सामोरे जावे लागले होते. तशी विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला परिक्षा दयावी लागत आहे. तुमच्या पाठीशी पक्ष आहेच त्याचबरोबर या राज्यातील १२ कोटी जनता तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास तटकरे यांनी त्यांना दिला.एखादयाचे ३० वर्षाचे राजकीय कारकीर्द पाण्यात घालण्याचा आणि आयुष्यातून उठवण्याचा अधिकार लोकशाहीत तुम्हाला कुणी दिला असा संतप्त सवाल वाहिन्यांना तटकरे यांनी केला. हे कालचक्र सर्वांसाठीच सुरु झाले आहे.जी चौकशी नेमायची ती नेमा परंतु फिक्सिंगची चौकशी करु नका असा टोलाही तटकरे यांनी लगावला.
कोणतीही शहानिशा न करता विधीमंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.आपण एकमेकांवर सभागृहामध्ये बोलतो परंतु तिसरी व्यक्ती बोलतेय याचा अर्थ गंभीर आहे.ती व्यक्ती विधानभवनात आली कशी,त्या व्यक्तीला पासेस कसे मिळाले याची सगळी चौकशी झाली पाहिजे असेही तटकरे म्हणाले.आज माध्यमांची विश्वासार्हता किती आहे हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.जे महिलांना सोडत नाहीय आणि विरोधी पक्षनेत्यांनाही सोडले जात नाही अशापध्दतीचे वृत्त मिडिया देत आहे याबद्दल आमदार विदया चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आक्रमकपणे मांडत असल्यानेच त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. आज वृत्तवाहिन्या आपली टिआरपी वाढवण्यासाठी सत्यता पडताळून न पाहता काहीही दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारविरोधी भूमिका गेली साडेतीन वर्ष मांडल्यानेच हे हेतुपुरस्कर आरोप केले गेले आहेत. ज्या सन्मानिय सदस्यांनी हे आरोप केले त्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर आरोप करताना नोटीस दयायला हवी होती. परंतु तशी कोणताही नोटीस दिलेली नाही. खालच्या सभागृहामध्ये ज्या वाचाळवीरांनी आरोप केले तसे ते नेहमी कुणावर ना कुणावर आरोप करत असतात.त्यामुळे ते खालच्या सभागृहाच्या पटलावरुन काढून टाकावे अशी मागणी आमदार अमरसिंह पंडीत यांनी केली. त्यांनी काही माध्यमं सरकारविरोधी बोलाल तर बदनाम करु अशा भूमिकेत वावरत आहेत असा आरोपही केला.