मंत्रीपद सोडेन पण नाणार प्रकरणी जनतेच्या पाठीशी !
उद्योगमंत्र्यांचा इशारा
मुंबई, दि. ७ वेळ पडली तर मंत्रीपदाचा राजीनामा दईल पण, नाणार प्रकल्पा विषयी कोकणातील जनतेच्या पाठीशी राहू, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली. मात्र, नाणारचा प्रकल्प करावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगत उद्योगमंत्र्यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलावला.
हुस्नबानू खलिफे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री देसाई बोलत होते. या प्रकल्पाला ६ हजार ७३५ शेतकऱ्यांनी हरकत घेत या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही. परिणामी भूसंपादन झाले नाही. हा प्रकल्प लादला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकार, राज्य सरकार, भारत पेट्रोकेमिकल्स, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स यांच्या वतीने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १६ गावांमध्ये हा भव्य प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार ४५३.७४५ हेक्टर आर तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३६१.१५७ हेक्टर आर खाजगी जमीन संपादित करावयाची आहे. परंतु, ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता तेथे भूसंपादन होणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.