आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?

आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?

विखे पाटील यांचा सवाल

मुंबई : मालेगावचे काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आरोपी अजून मोकाट कसे?  असा प्रश्न उपस्थित करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकार वैचारिक दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला.

आ. आसिफ शेख यांना नुकतीच फेसबुक व युट्यूबवर व्हीडीओ अपलोड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे पुराव्यांसह तक्रार देखील केली होती. परंतु, आरोपींना अद्यापही अटक झाली नसल्यासंदर्भात आ. आसिफ शेख यांनी आज पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

त्याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, आ. आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याची नाशिक क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती होती. माझेही पोलीस अधिक्षकांशी बोलणे झाले होते. परंतु, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.

वैचारिक दहशतवादाकडे सरकार डोळेझाक करते आहे. सनातन सारख्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच वैचारिक कट्टरवाद्यांची हिंमत वाढली असून, आमदारांनाही धमक्या दिल्या जात आहेत. सनातनविरूद्ध बोलतो म्हणून माझ्याविरूद्ध गोव्याच्या फोंडा न्यायालयात १० कोटी रूपयांचा दावा ठोकण्यात आला आहे. मी सनातनविरोधात बोलू नये म्हणून मला धमकावण्याचा प्रयत्न झालेला आहे, असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Previous articleएमपीएससी परीक्षेतील रॅकेटप्रकरणी विरोधकांचा सभात्याग
Next articleवंदना चव्हाण यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here