लाठीचार्ज प्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्तीच्या रजेवर
मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : औरंगाबाद कचरा आंदोलन प्रकरणी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि दगडफेक केल्याप्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबादच्या घटनेबद्दल सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अनेक गोष्टी याठिकाणी मांडण्यात आल्या त्या गंभीर आहे. या मुद्यावर सभागृहाची भावना लक्षात घेता औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल. याप्रकरणाची गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्या समितीच्या माध्यमातून एका महिन्यात चौकशी करण्यात येईल. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आंदोलनप्रकरणी स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील मात्र ज्यांनी पोलिसांना मारहाण केली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.