महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी अस्मिता योजना महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित
ना पंकजाताई मुंडे
औरंगाबाद : महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना असून येत्या महाराष्ट्र दिनापासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. विशेष म्हणजे मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसदर्भात महिलांमध्ये असलेला संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारण्यास या योजनेद्वारे नक्कीच मदत होणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील शाळकरी मुलींना सॅनिटरी पॅड विषयी माहिती मिळावी यासाठी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या समवेत या ग्रामीण भागातील शाळकरी मुलींनी हा शो पाहिला. शो संपल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ग्रामीण मुलींशी मनमोकळा संवाद साधला संवाद साधला. अनेक मुलींनी यावेळी आपल्या मनातील प्रश्न त्यांना विचारुन शंकांचे समाधान करुन घेतले.
पंकजाताई मुंडे बोलताना म्हणाल्या की, महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी अस्मितासारखी क्रांतिकारी योजना तयार करु शकलो याचा मोठा अभिमान वाटत आहे. अस्मिता योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढेल, महिलांचे आरोग्य सुधारे, बचतगटांच्या महिलांना रोजगार मिळेल. त्यामुळे ही योजना महिलांच्या आरोग्य रक्षणाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनवणारी योजना आहे. १ मेपासून ही क्रांतिकारी योजना कार्यान्वित होणार आहे. केवळ ५ रुपये प्रती पॅकेट प्रमाणे ग्रामीण भागातील शाळकरी मुलींना वर्षांतून १३ पॅकेट मिळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
मुलींनी मानले पंकजाताईचे आभार
यावेळी उपस्थित शाळकरी मुलींनी ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविल्याबद्दल पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले असेही अनेक विद्यार्थींनींनी सांगितले. चित्रपटाच्या शेवटी अनेक मुलींनी प्रश्न विचारुन शंकांचे निरसन करुन घेतले. एका शाळकरी मुलीने विचारलेल्या ‘शाळेबाहेरील विद्यार्थीनींना आणि इतर महिलांना हे पॅड कसे मिळणार’ या प्रश्नाला मंत्री पंकजा मुंडे उत्तर देतांना म्हणाल्या की ‘राज्यातील सर्व महिलांना हे पॅड मिळावे अशी माझी इच्छा आहे पण सुरूवातीला जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थीनींसाठी हे पॅड देण्यात येणार आहेत. शाळाबाहेरील मुली आणि महिलांना हे पॅड मिळावेत म्हणून ‘अस्मिता फंड’ बनवला आहे या फंडच्या माध्यमातून आम्ही हे पॅड देणार आहोत. अभिनेता अक्षय कुमारने १० हजार महिलांना पॅड मिळण्यासाठी निधी दिला आहे या निधीच्या माध्यमातून आम्ही तुरुंगातील, अनाथआश्रमातील महिलांना पॅड पुरविणार आहोत ’ असेही त्या म्हणाल्या.