वनगा कुटूंबियांचा भाजपला रामराम

वनगा कुटूंबियांचा भाजपला रामराम

शिवसेना पक्ष प्रमुखांची घेतली भेट

मुंबई : पालघरचे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांनी लोकसभा पोटनिवडणूकीच्या तोंडावर भाजपला सोडचिट्ठी दिली असून,त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालघरचे भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे अलीकडेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील होते. अखेर भाजपाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री, या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्या मातोश्री देखील उपस्थित होत्या.

या भेटीनंतर बोलताना या दोघांनाही अश्रू आवरता आले नाहीत. आमच्या कुटुंबाने गेली ३५ वर्षे भाजपाचे काम केले. जेव्हा पक्षाला फक्त दोन मते पडायची तेव्हापासुन वडीलांनी भाजपाचे काम केले.परंतु चिंतामण वनगा यांचे निधन झाले आणि भाजपाने आम्हाला वाऱ्यावर सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु, दोघांकडून कोणतीही वेळ देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला भाजपने वा-यावर सोडल्याने शिवसेनेत प्रवेश केला असे श्रीनिवास वनगा यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमची निष्ठा होती म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.

 

Previous articleमागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय
Next articleकोकणातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ देणार नाही !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here