शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ : शरद पवार
मुंबई : केंद्र सरकार कोणतीच अंमलबजावणी करत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.बळीराजा सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्याला व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तो कर्जबाजारी झाला आहे.त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेत आहे.त्यामुळे त्यांच्या पाठिशी समाजातील सर्व घटकांनी उभे रहावे असे आवाहन करतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी माध्यमांशी बोलताना वरील आवाहन केले.
चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागोजागी सांगितले की, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊले टाकली जातील. पण या गोष्टीची अंमलबजावणी गेल्या चार वर्षात झालेली नाही. सरकारने याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी काही पहिल्यांदाच करत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांत कधी दिल्लीला, कधी दक्षिण भारतात, कधी उत्तर प्रदेशात तर कधी मध्यप्रदेशात तर कधी आपल्या महाराष्ट्रात शेतकरी सातत्याने रस्त्यावर येवून आपली भूमिका मांडत आहेत असेही शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकारने आणि ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तिथे सांगितले की, आम्ही या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहोत. त्यांनी असेही सांगितले की सरकार मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देखील करणार आहे. ही अंमलबजावणी आजही होत नाही म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. माझी देशवासियांना विनंती आहे की, बळीराजा काही सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजातील इतर घटकांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे. हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनाचा कार्यक्रम नाही. शेतकऱ्यांच्या या संघर्षाला साथ दिली पाहिजे असेही शरद पवार यांनी सांगितले.











