जाती-पातीचे वाढते राजकारण चिंतेची बाब –  पंकजा मुंडे

जाती-पातीचे वाढते राजकारण चिंतेची बाब –  पंकजा मुंडे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराचे पुण्यात  वितरण

पुणे :  प्रत्येक समाजातील उपजातींना वेगळे करण्याचा घाट सध्या घातला जात असून, जाती-पातीचे वाढते राजकारण हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे आपण मागे की पुढे जाणार आहोत याचा विचार अंतर्मुख होऊन करायला पाहिजे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजा मुंडे यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य मातंग समाजाच्या वतीने  वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, आ. विजय काळे, योगेश टिळेकर, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, श्रीनाथ भिमाले, सिंबायोसिसचे संस्थापक डॅा. शा. ब. मुजुमदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांच्या हस्ते याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, बिशप थॅामस  डाबरे, साहित्यिक संपत जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, वृत्तनिवेदिका नम्रता वागळे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने गौरविण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे काम खूप मोठे होते, त्यांनी फक्त एका विशिष्ट समाजासाठी काम केले नाही त्यामुळे अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार एका समाजासाठी न देता समाजकार्य करणा-यांसाठी देण्याचा संघटनेचा उद्देश आहे असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.  आरक्षण हे फक्त शिक्षण, नोकरी व सुविधा मिळण्यासाठी नसून जातींना विशेष सन्मान मिळावा यासाठी आहे. मराठा समाजाकडे आतापर्यंत सत्ता होती; परंतु मराठा समाजातील तरूणांची अवस्था बघून मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते असे सांगून  जोपर्यंत सामाजिक मागासलेपणा जात नाही, रोटी-बेटीचे व्यवहार विशिष्ट समाजाबाहेर होत नाहीत तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दाही जाणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Previous articleजाती-पातीचे वाढते राजकारण चिंतेची बाब –  पंकजा मुंडे
Next articleकृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खा. संजय पाटील